अकोला : लॉकडाऊनचे काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, रुग्णसंख्या वाढीचा आलेख काहीसा घसरल्याचे गत आठवडाभरात दिसून आले. ही दिलासादायक बातमी असली, तरी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले, तरी नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. मे महिन्यात कोरोनाचा फैलाव वेगाने झाला. त्यामुळेच या महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे निदर्शनास आले; मात्र मागील काही दिवसांपासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे सकारात्मक परिणाम गत आठवडाभरात दिसू लागले आहे. जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोविड रुग्णांचे प्रमाण काही प्रमाणात घसरले आहे. ही आकडेवारी अकोलेकरांना दिलासा देणारी असली, तरी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. अकोलेकरांसाठी ही बाब चिंता वाढविणारी आहे.
म्हणून वाढताहेत गंभीर रुग्ण
लक्षणे दिसूनही बहुतांश रुग्ण चाचणीऐवजी फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतात.
यामध्ये तीन ते चार दिवस घालवितात.
आजार आणखी वाढल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी आणि सीटीस्कॅन करतात.
तोपर्यंत कोविडची लागण होऊन सहा ते सात दिवसांचा कालावधी झालेला असतो.
सीटी स्कोअर आल्यानंतर दोन दिवस खासगी डॉक्टरकडेच उपचार सुरू राहतो.
मात्र, तोपर्यंत उशीर झालेला असतो. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झालेली असते.
अशा वेळी रुग्णाला ऑक्सिजन, तर काहींना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते.
११ दिवसांचा आलेख
तारीख - पॉझिटिव्ह रुग्ण - मृत्यू
१४ मे - ६५९ - १३
१५ मे - ५२३ - २७
१६ मे - ५३७ - १७
१७ मे - ४५९ - १९
१८ मे - ४२५ - १६
१९ मे - ४९३ - १५
२० मे - ६७० - १८
२१ मे - ५०३ - १७
२२ मे - ५२५ - ११
२३ मे - ४०८ - ६
२४ मे - २१४ - ५
अनेक लाेक लक्षणे असूनही कोविड चाचणी करीत नाहीत. त्यामुळे उपचारास उशीर होतो. परिणामी रुग्णाचे शरीर उपचारास साथ देत नाही. आपल्या शरीरावर कोरोनाचा गंभीर प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेत चाचणी करा आणि उपचारास सुरुवात करा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.