अकोला : अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. यामधून प्रशासनाने डांबरीकरणाची कामे प्रस्तावित केली; परंतु उपलब्ध निधी पाहता, किमान सात ते आठ रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची मागणी विरोधी पक्षनेता हरीष आलिमचंदानी यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी विरोधी पक्षनेत्यांची मागणी मान्य करीत तसे निर्देश मनपाला दिल्याने सात रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, खड्डय़ांमुळे अकोलेकरांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची पुरती ऐशीतैशी झाली. यावर राज्य शासनाने १५ कोटींचे अनुदान वितरित केले. उपलब्ध निधीच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रमुख १८ रस्त्यांची कामे प्रस्तावित केली. यामध्ये डांबरीकरणाचा समावेश होता. रस्ते दुरुस्तीसाठी एवढा मोठा निधी मनपाला पहिल्यांदाच प्राप्त होत असल्याने निधीतून दज्रेदार कामे व्हावीत, याकरिता विरोधी पक्षनेता हरीष आलिमचंदानी यांनी विभागीय आयुक्तांकडे सतत पाठपुरावा केला. उपलब्ध निधी लक्षात घेता, शहरात किमान सात ते आठ रस्ते सिमेंट काँक्रिटचे केल्यास कायमची डोकेदुखी बंद होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र देताच, विभागीय आयुक्तांनी मनपा प्रशासनाला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता १८ रस्त्यांमधील प्रमुख सात रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, हे निश्चित झाले आहे.
१५ कोटीच्या निधीतून काँक्रिट रस्त्यांचे निर्माण
By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST