अकोला: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी रिंगण करून शेतमालाची खरेदी करीत असल्याचा प्रकार बुधवारी पुन्हा उघडकीस आला. याप्रकारातून शेतकर्यांची लूट होत असल्याने शेतकर्याने प्रशासकाकडे तक्रार केल्यामुळे गुरुवारी व्यापार्यांनी प्रशासन व अडत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोयाबीनची खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकर्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही महिन्यांपासून व्यापारी रिंगण करून शेतमालाची खरेदी करीत आहेत. ८ एप्रिल रोजी हिंगणी येथील शेतकरी गोपाल दातकर यांच्या शेतमालाची खरेदी रिंगण करून करण्यात आली. यामध्ये शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अडते राजेंद्र जोशी यांनी प्रशासकाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ८ एप्रिल रोजी त्यांच्या अडतमध्ये गोपाल दातकर यांनी सोयाबीन विक्रीला आणले होते. सोयाबीनचा खुला ढीग झाल्यानंतर हर्रासीसाठी बोली लावण्याकरिता सोयाबीनचे दोन खरेदीदार वगळता अन्य खरेदीदार बोली लावण्यास तयार नव्हते. प्रत्येकजण मोबाईलवर बोलत एकमेकांना संशयास्पद इशारे करीत होते. यावरून खरेदीदार आपसात संगनमत करून सोयाबीनचा माल खरेदी करतात. तसेच रिंगण करून शेतकर्यांची फसवणूक व पिळवणूक करतात. या प्रकारची वागणूक यापूर्वीही शेतकर्यांना देण्यात आली आहे. अकोला बाजार समितीत आपसात संगनमत करून व रिंगण करून खरेदीदार बाजार समितीच्या प्रतिष्ठेला धक्का देत आहेत. तसेच शेतकरी, बाजार समिती प्रशासन व शासनाची फसवणूक करीत आहेत. या प्रकारात सहभागी असलेले सोयाबीनचे खरेदीदार दयाल एनर्जीचे भिकू काबरा, मारोती उद्योगचे शरद सारडा यांच्यासह अन्य व्यापार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासकाकडे तक्रार; व्यापा-यांनी केली खरेदी बंद
By admin | Updated: April 10, 2015 02:09 IST