अकोला, दि. १- राष्ट्रीय व राज्य महामार्गांंपासून ५00 मीटरच्या आत असलेली सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने, वाईन बार व बीअर शॉपी बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू झाली असताना, अकोला शहरात एकाच व्यापारी संकुलातील वरच्या मजल्यावरील वाईन शॉप बंद आणि खालच्या मजल्यावरील वाईन बार मात्र सुरू असल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हय़ातील सर्व देशी व विदेशी दारू दुकाने, वाईन बार आणि वाईन शॉपींच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांंपासूनच्या अंतराची मोजणी केली. त्यानुसार परवाने रद्द होणार असलेल्या व कायम राहणार असलेल्या दुकान व बारच्या याद्या तयार करण्यात आल्या. अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरील इन्कम टॅक्स चौकातील एकाच व्यापारी संकुलामधील वरच्या मजल्यावरील वाईन शॉपचा समावेश परवाना रद्द झालेल्या यादीमध्ये करण्य़ात आला आहे, तर त्या दुकानाच्या अगदी खालीच, खालच्या मजल्यावर असलेल्या वाईन बारचा परवाना मात्र कायम राहिला आहे. शनिवारी ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या बाधित व अबाधित दारू दुकाने, बार व बीअर शॉपीच्या पाहणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. गोरक्षण मार्गावरील इन्कम टॅक्स चौकामध्ये असलेल्या एका व्यापारी संकुलात वरच्या मजल्यावर एक वाईन शॉप आहे, तर खालच्या मजल्यावर एक वाईन बार आहे. राष्ट्रीय महामार्गापासून या दोन्ही प्रतिष्ठानांचे अंतर सारखे असायला हवे; परंतु दोन्ही दुकानांमध्ये तब्बल १७ मीटर म्हणजेच ५५.७७ फुटांचे अंतर दाखविण्यात आले आहे. वाईन बारचे अंतर ५0५ मीटर, तर वाईन शॉपचे अंतर ४८८ मीटर दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे वाईन बारचा परवाना कायम राहिला, तर वाईन शॉपचा परवाना रद्द झाला आहे. त्यानुसार आज वाईन शॉप बंद, तर वाईन बार सुरू आढळला. अंतराबाबतचा हा घोळ केवळ अकोला शहरातच नव्हे, तर अन्य ठिकाणीही झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने, वाईन बार व बीअर शॉपींच्या महामार्गांंपासूनच्या अंतरांची नव्याने काटेकोर मोजणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गुगल मॅपनुसार बार व शॉप ५00 मीटरच्या आत! इन्कम टॅक्स चौकातील एकाच इमारतीत असलेला वाईन बार आणि वाईन शॉप हे दोन्ही गुगल मॅपनुसार महामार्गापासून ५00 मीटरच्या आत असल्याचे दिसते.वाईन शॉप व बारमध्ये बरेच अंतर आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांच्या समितीने न्यायालयाच्या आदेशानुसार दारूचे दुकान व बारच्या अंतरांची मोजणी केली आहे. मोजणी पारदर्शक पद्धतीने झाली असून, दुकानांचे मालकही त्यावेळी उपस्थित होते; अन्यथा अनेकांनी मोजणीबाबत तक्रारी केल्या असत्या. - राजेश कावळे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग.
वरच्या मजल्यावरील वाइन शॉप बंद; तळमजल्यावरील बार सुरू!
By admin | Updated: April 2, 2017 02:59 IST