खामगाव (बुलडाणा) : जलंब रेल्वे स्टेशनवरील रेल्वे बुकिंग क्लार्कने पॅसेजर गाडीचे वॉरनिंग येताच बुकिंग बंद करुन खोली सुध्दा बंद केली व पॅसेजर गाडीने घरी निघून गेला. मात्र ऐन पॅसेजर गाडी येण्याआधी बुकिंग बंद झाल्याने अनेक प्रवाश्यांना तिकिट न मिळाल्याने नाईलाजाने फुकटचा प्रवास करावा लागला. ही घटना जलंब रेल्वे स्थानकावर आज सकाळी ८.४0 वाजताचे सुमारास घडली. भुसावळ-नरखेड पॅसेजर तसेच जलंब ते खामगाव ही रेल्वेगाडी सकाळी ८.४0 वाजताचे सुमारास जलंब रेल्वे स्थानकावर थांबते. या पॅसेजरने प्रवास करण्यासाठी प्रवासी तेथील बुकिंग खिडकीवर गेले. मात्र बुकिंग क्लार्कने बुकिंग बंद केली. यामुळे ऐन गाडी येण्याचे वेळेसच तिकीट नसल्याने व्दिधा मनस्थितीत अडकून अडचणीत आले. मात्र यापैकी अनेकांचा नियोजित प्रवास असल्याने तर काहींना उपचारासाठी जाणे आवश्यक असल्याने अशांनी तिकीट न घेताच प्रवास करणे पसंत करुन गाडीत प्रवेश केला. एकंदरीत रेल्वे स्थानक प्रमुख तसेच बुकिंग क्लार्कच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाश्यांना विनातिकीट प्रवास करण्याची वेळ आली. तर अनेकांना तिकीट नसताना प्रवास केल्याने प्रवासादरम्यान पुढे अपमानित वा दंडित होण्याची वेळ सुध्दा बुकिंग क्लार्कच्या बेजबाबदारपणामुळे आली असेल. सोबतच आधीच तोट्यात चालणार्या रेल्वेला यामुळे उत्पन्नावर सुध्दा पाणी सोडावे लागले. अधिकारी व कर्मचार्यांच्या अशा बेफिकीरीमुळेच प्रवाश्यांची खचाखच गर्दी असतानाही रेल्वेला दरवर्षी तोटाच सहन करावा लागतो, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाश्यांनी व्यक्त केल्या. तसेच या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता या रेल्वे स्टेशनवरील दोन्ही बुकिंग क्लार्क शेगाव येथे राहत असून तेथून अप-डाऊन करताना. आज ड्युटीवर असलेले जोशी नामक बुकिंग क्लार्कची ड्युटी सकाळी ८ वाजता संपल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या वेळेपर्यंत त्यानंतर ड्युटी असलेला बुकिंग क्लार्क पोहोचला नाही. त्यामुळे जोशी यांनी बुकिंग बंद करुन घर गाठले. तर उशीरा येणारा बुकिंग क्लार्क शेगाव येथून दुचाकीने येत असताना पॅसेजर गाडी जात असल्याने खामगाव रस्त्यावरील गेट बंद झाल्याने तेथे अडकला. गेट उघडल्यानंतर पुन्हा बुकिंग सुरु झाली. मात्र तोपर्यंत पॅसेजर निघून जाणार असल्याने अनेकांना नाईलाजाने विनातिकीट प्रवास करण्याची वेळ आली.
क्लार्कने बुकिंग बंद करून पकडली गाडी!
By admin | Updated: October 17, 2014 23:58 IST