पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातील काही भागांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छता भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, कचरा नसलेल्या ठिकाणी राजकीय नेत्यांकडून झाडू फिरवला जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनातर्फे देशभर राबविल्या जाणाºया स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश चांगला असला तरी त्याचा उपयोग केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी होत असल्याने त्यावर टीका होत आहे.देशातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. तसेच या अभियानास तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तच राजकीय पक्षाचे नेते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. वर्षभर पहाटे उठून शहरात स्वच्छता करणाºया पालिकेच्या व स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांचा नेत्यांना विसर पडल्याचे दिसून आले.गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या कचºयाचा प्रश्न सुटलेला नाही. शहरात दररोज जमा होणाºया सुमारे सोळाशे टन कचºयापैकी पालिकेतर्फे सुमारे ६०० ते ७०० टन कचºयावरच प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित कचरा शहरालगतच्या कचरा डेपोत टाकला जात आहे. त्यातच कचरा गोळा करणाºया कामगारांच्या आरोग्याला हानी पोहेचू नये, यासाठी त्यांना आवश्यक साहित्य देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नाही. स्वच्छता राखणाºया कामगारांना नोकरीची शाश्वती नाही. नियमित वेतन देण्याबाबतही काळजी घेतली नाही.शहरातील पेठांमध्ये व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी कचरा पेटी तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यालगतच्या कचरा पेटीसह गल्लीतील कचरा पेटीजवळ दुर्गंधी पसरली आहे. मात्र, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याऐवजी इतर ठिकाणीच झाडू घेऊन नेते फोटो काढून घेतले असल्याने सोशल मीडियावरूनही टीका केली आहे. स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात काही नेत्यांनी स्वत:ची ताकद दाखविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे स्वच्छता अभियान हे नावापुरतेच राहिले का? असा प्रश्न उपस्थित झाला.
स्वच्छता अभियान नावापुरतेच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:24 IST