अकोला : येत्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत अकोलेकरांच्या सेवेत शहर बस वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी भाजपच्या पदाधिकार्यांसह महापालिका आयुक्तांना दिले. संचालक अशोक जाधव सिटी बससेवेच्या करारनाम्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी मनपात दाखल झाले असता त्यांनी महापौर, स्थायी समिती सभापतींची भेट घेतली. अकोलेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शहरात धावणार्या सिटी बसेसचा दर्जा योग्य असावा, यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने आग्रही आहेत. प्रवाशांची खचाखच गर्दी, जागेसाठी होणारी बाचाबाची असे चित्र यापुढे दिसणार नाही. याची पुरेपूर काळजी प्रशासनासह संबंधित कंत्राटदाराकडून घेतली जाईल. मनपाच्या स्थायी समितीने सिटी बससेवेला मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला. प्रशासनाने तयार केलेल्या करारनाम्यावर चर्चा करून त्यामध्ये काही बदल-दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सचे संचालक अशोक जाधव यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांची भेट घेतली. अकोलेकरांच्या सेवेत ३0 आसनी प्रवासी क्षमता असलेल्या ३0 बस धावतील. उर्वरित पाच बस राखीव ठेवल्या जाणार आहेत. श्रीकृपा ट्रॅव्हल्स कंपनीसोबत केलेल्या करारात टाटा ७0९ ई एक्स वाहन खरेदीची अट नमूद आहे. शहरातील रस्त्यांची रूंदी लक्षात घेऊन तशा आकाराच्या बस विकत घेण्यावर अशोक जाधव यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. यावेळी उपायुक्त सुरेश सोळसे, समाधान सोळंके, शहर अभियंता इकबाल खान, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, विद्युत विभागप्रमुख श्याम बगेरे आदी उपस्थित होते.
दोन महिन्यांत धावणार सिटी बस!
By admin | Updated: August 2, 2016 01:52 IST