अकोला : बालिकेसोबत कुकर्म करणारा आरोपी महादेव रामा हरणे (४0) यास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचा आदेश प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांनी गुरुवारी दिला. बोरगाव मंजू पोलीस ठाणे अंतर्गत एका भागात दोन बहिणी (मोठी १0 वर्षीय आणि लहान ५ वर्षीय) आजी-आजोबासोबत राहत असून, दोघींचे आई-वडील मजुरीसाठी दुसर्या शहरात राहतात. २८ फेब्रुवारी २0१२ रोजी पाच वर्षीय बालिका शाळेतून परतल्यानंतर घराच्या अंगणात खाटेवर झोपली होती. त्यावेळी तिची मोठी बहीण लघुशंकेसाठी बाहेर गेली होती, तर आजी कापूस वेचणीसाठी शेतात आणि आजोबा कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्याचवेळी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कुरणखेड येथील जुन्या वस्तीतील रहिवासी महादेव रामा हरणे बालिकेच्या घरी पोहोचला आणि खाटेवर झोपलेल्या बालिकेला उचलून घराच्या मागे घेऊन गेला व तेथे त्याने बालिकेसोबत मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. दरम्यान, तेथे पोहोचलेल्या बालिकेच्या मोठय़ा बहिणीने महादेवचे कुकर्म पाहून आरडाओरड केल्याने, आरोपीने तिचाही विनयभंग करून तेथून फरार झाला. शेतातून व बाजारातून घरी आलेल्या आजी-आजोबांना दोन्ही बहिणींनी घटनेची माहिती दिल्यानंतर, पीडित दोन्ही बालिकांना सोबत घेऊन त्यांची आजी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात पोहोचली व त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महादेव हरणे विरुध्द कलम ४५१, ३७६ आणि ३४५ अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहातच होता, दोन्ही बालिकांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान आठ साक्षीदारांचे बयाण तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीविरुद्ध सिद्ध झालेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी महादेव रामा हरणे यास कलम ३७६ अन्वये दहा वर्षांचा सश्रम करावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन महिने सश्रम कारावास, कलम ३५४ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन महिन्याचा सश्रम कारावास आणि कलम ४५१ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीस या सर्व शिक्षा एकसाथ भोगाव्या लागतील. या प्रकरणात सरकारच्यावतीने अँड.मंगला ए.पांडे यांनी बाजू मांडली.
बालिकेशी कुकर्म; आरोपीस दहा वर्षांचा कारावास
By admin | Updated: March 27, 2015 01:27 IST