अकोला: अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील एक स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी (डीएसओ) बी.यू. काळे यांनी सोमवार, २३ ऑगस्ट रोजी दिला. संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराच्या परवान्याची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली.
धोतर्डी येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण सोनटक्के यांच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण वेळेवर होत नाही, धान्य वितरणात पैसे जादा घेण्यात येत असून, धान्य कमी देण्यात येते, तसेच स्वस्त धान्य दुकानदाराकडून व्यवस्थित वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, अकोला तहसील कार्यालयाच्या पथकामार्फत संबंधित स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, धोतर्डी येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण सोनटक्के यांचा स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी दिला. संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराच्या परवान्याची पाच हजार रुपयांची अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात आल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी सांगितले.