तालुक्यातील गाडेगाव येथील २१ वर्षीय मुलीचा विवाह संबंध केळीवेळी येथील मुलासोबत ठरला होता. कुंकुवाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दि. २५ मार्च रोजी आरोपींनी मुलीकडे येऊन वधूपित्यास दोन लाख रुपये हुंडा व ‘हायफाय’ लग्नाची मागणी समोर केली. एवढे पैसे देण्याची माझी ऐपत नसल्याचे फिर्यादीने सांगताच आरोपींनी मागण्या मान्य असतील, तर ठीक अन्यथा हा संबंध मोडला, असे समजा अशी भाषा वापरून निघून गेले. अशा आशयाची तक्रार तेल्हारा पोलिसात दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाली. नागोराव चापूना वानखडे (रा. गाडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तेल्हारा पोलिसांनी आरोपी विकास सिरसाट, मिलिंद सिरसाट, बाळू भटकर, चंद्रकला सिरसाट सर्व (रा. केळीवेळी, ता.अकोट) यांच्याविरुद्ध हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जगदीश पुंडकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
हुंड्याची मागणी करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST