अकोला : पावसाच्या पाण्याचे शेतात संधारण होण्यासाठी रुंद सरी वरंबा टोकण व आंतरमशागत पद्धतीने (बीबीएफ प्लांटर ) पेरणी करण्यासाठी प्रचार कृषी विभागाने राज्यभर केला आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे पीकपेरणीत बदल करणे आवश्यक असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात बदल करण्याचे संशोधन हाती घेतले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बीबीएफ यंत्राने मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका, भुईमूग, हरभरा आदी पिकांची पेरणी करता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित यंत्राने पेरणी केल्यास हवा आणि जमिनीतील ओलाव्याचे संतुलन योग्यप्रकारे राखता येत असल्याने पिकांना फायदा होतो. या यंत्रामुळे पांरपरिक पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी लागत असून, ऊर्जाही कमी लागते. राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र अवघे १७ टक्के आहे. त्यामुळे जिरायती शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारण ही काळाची गरज असल्याने या यंत्रपद्धतीने पेरणी केल्यास पावसाचे पाणी वाया जाऊ न देता शेतात मुरवले जाते. ट्रॅक्टरचलित असलेल्या या यंत्राद्वारे एकाच वेळी रुंद सरी व वरंबा पाडून त्यावर पेरणी करणे शक्य असून, एकाच वेळी खते देणे शक्य असल्याने कृषी विभागाने या यंत्राचा मोठय़ा प्रमाणात प्रचार केला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्यांनी या पेरणी पद्धतीचा वापर करू न पिके घेणे सुरू केले आहे. दरम्यान, अलीकडे पावसाची अनिश्चितता वाढली असल्याने त्यानुसार पीकपेरणी पद्धतीत बदल करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे या यंत्राला नव्याने तयार करण्याची गरज कृषी शास्त्रज्ञांना वाटत आहे. आंतरपीक पेरणीमध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन पीक वाढते, पण तूर वाढत नसल्याचे दिसून आले आहे. यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात सुधार करण्याचे ठरवले आहे. एक ओळ तूर आणि दोन ओळी सोयाबीन पेरता यावे अशी सोय नवीन बीबीएफ यंत्रात करण्याची गरज असल्याने फुले कृषी विद्यापीठाने त्यावर संशोधन हाती घेतले आहे.
रुंद सरी वरंबा पद्धती यंत्रात करणार बदल!
By admin | Updated: November 24, 2015 01:14 IST