नितीन गव्हाळे / अकोला: नागपूर कारागृहातून पाच कैदी पळून गेल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यावरून राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेविषयक उपाययोजना किती कुचकामी आहेत, हेदेखील स्पष्ट झाले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्हा कारागृहातील सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला असता, काही बाबी गंभीर असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा कारागृहामध्ये सीसी कॅमेरे बसविले आहेत, परंतु काही कॅमेर्यांचे नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले नाही. मोबाइल जामर लागले असतानाही कॉल बिनदिक्कतपणे लावता येतात. नागपूर कारागृहातून पाच कुख्यात कैदी २५ फुटांची भिंत ओलांडून पसार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे कारागृहांतील सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे, हे समोर आले. यानिमित्ताने मंगळवारी ह्यलोकमतह्णने अकोला जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. जिल्हा कारागृह परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी १ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीतून २३ सीसी कॅमेरे लावण्यात आले. यातील मोजक्याच कॅमेर्यांना डिस्प्ले आहेत आणि इतर कॅमेरे डिस्प्लेशिवाय आहेत. त्यामुळे कॅमेर्यांनी टिपलेले चित्रणाचा संग्रह करता येत नाही. कारागृहातील कैद्यांच्या, कर्मचार्यांच्या हालचाली टिपण्यासाठी डिस्प्ले (टीव्ही) असणे गरजेचे आहे; परंतु निधीअभावी कारागृह प्रशासनाला डिस्प्ले खरेदी आले नाहीत. त्यामुळे कारागृहात सीसी कॅमेरे असूनही कोणताच उपयोग होत नसल्याने कारागृहातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारागृहात सीसी कॅमेरे, परंतु डिस्प्ले नाही!
By admin | Updated: April 8, 2015 01:47 IST