लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमध्ये खरेदी केलेल्या सीसी कॅमेरे खरेदीप्रकरणी झालेल्या घोळाची चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी केली. यावेळी सातही गटविकास अधिकारी, मुख्य लेखा व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. आता चौकशी अहवाल लवकरच शासनाकडे सादर होण्याची शक्यता आहे. पंचायत समित्यांमध्ये गरज नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या २९ लाख रुपये निधी खर्चातून सीसी कॅमेरे खरेदी घोटाळा झाला. कॅमेरे, डीव्हीआर केबल, पॉवर अॅडॉप्टर, हार्डडिस्क, साहित्य लावण्याचा खर्च, सॉफ्टवेअर इत्यादी वेगवेगळ्या बाजारपेठेपेक्षा जवळपास ७० पट जास्त दराने खरेदी करण्यात आली. याप्रकरणी मोठा घोळ असल्याचे सांगत आमदार रणधीर सावरकर यांनी पुराव्यानिशी शासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ७ पैकी ६ पंचायत समित्यांमध्ये सीसी कॅमेरे बंद आढळले. या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी नियोजनबद्धतेने घोटाळा केल्याचे दिसत असल्याने आमदार सावरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सादर केलेल्या अहवालात याप्रकरणी क्लीन चीट देण्यात आल्याचे सभागृहात सांगण्यात आले, त्यामुळे मोठा घोळ असल्याची शंका खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. एक महिन्यात चौकशी करून संबंधितांवर निश्चितपणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत दोन ते तीन वेळा संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी आयुक्तांनी केली आहे. बुधवारी त्यांनी अकोल्यात दाखल होत प्रकरणातील विविध मुद्यांची माहिती घेतली. त्यामुळे आता या प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच शासनाकडे सादर होण्याची शक्यता आहे.
सीसी कॅमेरे खरेदीचा अहवाल लवकरच शासनाकडे!
By admin | Updated: May 18, 2017 01:46 IST