अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरात पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली ५६ धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी चारही क्षेत्रीय अधिकार्यांना दिले. पूर्व झोनमधील धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई वगळता इतर झोन अधिकार्यांनी काढता पाय घेतल्याने मनपाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. शहराच्या कानाकोपर्यात, जागा दिसेल त्या ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी करण्याचा नागरिकांनी सपाटा लावला. शासकीय जागा,ले-आउटमधील ओपन स्पेस, मुख्य रस्ते व गल्लीबोळात पूज्य व्यक्ती, संतांच्या प्रतिमा व पुतळे उभारण्यात आले. चौकांमध्ये, रस्त्यालगत तसेच नाल्यांवर उभारलेल्या अशा धार्मिक स्थळांकरिता कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अनेकदा अप्रिय घटना घडतात. यामुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याचे प्रकार वाढले आहेत. या बाबी लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांना हटवण्याचे आदेश राज्य शासनाला जारी केले आहेत. शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळांच्या नोंदी घेत पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली ५६ स्थळे हटविण्याचे क्षेत्रीय अधिकार्यांना आदेश दिले. त्यानुसार चारही झोन अधिकार्यांनी दररोज त्यांच्या क्षेत्रातील धार्मिक स्थळे हटवून कारवाईचा अहवाल प्रशासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी मात्र पूर्व झोनमधील कारवाया वगळता पश्चिम झोन, उत्तर व दक्षिण झोनमध्ये कारवाई होत नसल्याचे चित्र समोर आले. पश्चिम झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे आणि दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी हात आखडता घेतल्याचे दिसत आहे.
मोहीम थंडावली; झोन अधिका-यांचा काढता पाय
By admin | Updated: February 5, 2016 02:13 IST