अकोला : परप्रांतीय घरफोड्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शुक्रवारी टोळीतील तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमधील घरांमध्ये कपडे विकण्याच्या बहाण्याने घुसायचे आणि घरातील सर्व माहिती जाणून घ्यायची. त्यानंतर घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेणारी परप्रांतीय घरफोड्यांची एक टोळी अकोल्यात कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुरुवारी आकोट फैलातील भारतनगरातील एका ठिकाणी छापा घालून आंध्र प्रदेशातील निजामाबाद शहरातील ऑटोनगरात राहणारा सैयद शरीफ सैयद दाऊद (२८), निजामाबाद शहरातील हबीबनगरात राहणारा सैयद बिलालुद्दीन सैयद आरिफुद्दीन (२२) आणि ऑटोनगरातील एका १७ वर्षीय मुलास अटक केली. निजामाबादचाच राहणारा शेख सादत शेख बाबू (२२) हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. हे चारही युवक दोन ते तीन महिन्यांपासून अकोल्यात वास्तव्यास आहेत. कपडे विकण्याचा व्यवसाय करण्यासोबत, शहरात फिरून दिवसा घरफोड्या करण्याचाही त्यांचा उद्योग सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींकडून या घरफोडीतील ५0 हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने जप्त केले.
कपडे विकण्याचा बनाव करून घरफोड्या!
By admin | Updated: May 29, 2014 21:16 IST