अकोला : बीटी कपाशीवरील बोंडअळी प्रतिकारक्षमता वाढली असून, या कापसाच्या उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निष्कर्ष विदेशी कृषी शास्त्रज्ञांनी काढले आहेत. (रेफ्युजी) बिगर बीटीची पेरणी केल्यास मात्र या बोंडअळीला व त्यांच्या भावी पिढीला प्रतिबंध घालता येऊ शकतो, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. बीटी कापसाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, त्यासोबत बिगर बीटी (रेफ्युजी) बियाणे शेताच्या बांधावर पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, अमेरिका, चीन या प्रगत देशातील काही भागातील शेतकर्यांनी बिगर बीटीचा वापरच केला नसल्यामुळे त्या भागात बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ा निर्माण झाल्या असून, त्याचा परणिाम सरळ कापूस उत्पादनावर होत आहे. त्यामुळे या अळींच्या व्यवस्थापनासाठीचा खर्चसुद्धा वाढला आहे. विदेशी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे. भारतात आतापर्यंंत नैसर्गिकरित्या या अळ्य़ांचे व्यवस्थान होत आले आहे; परंतु या अळ्य़ांची वाढत चाललेली प्रतिकारक्षमता बघता भारतीय कृषी शास्त्रज्ञांपुढे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.सन २00२ मध्ये भारतात केवळ ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जात होती. आजमितीस हे क्षेत्र ८0 ते ८५ टक्के वाढले आहे. सहा महिन्याचे हे पीक आहे. त्यामुळे या एका हंगामात कापसावर या हिरव्या बोंडअळीच्या ४ ते ६ पिढय़ा उपजीविका करतात, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. भारतात सन २00२ पासून बीटी कापसाचा पेरा केला जात आहे. त्यामुळे या अळ्य़ांना बीटी कापसावर जगण्याची सवय होऊ लागली आहे. म्हणूनच काही विशिष्ट भागात बीटी कापसावर शेतकर्यांना जिवंत अळ्य़ा दिसत असून, त्यांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सुरू राहिली, तर बीटी कापसामध्ये असलेल्या बोंडअळीला प्रतिबंधक विष पचविण्याची शक्ती येण्याची शक्यता वाढली असून, बिगर बीटीऐवजी बीटी कापूस हेच या अळीचे मुख्य खाद्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बीटी कापसासोबतच बिगर बीटीची पेरणी करण्याचे आवाहन शेतकर्यांना केले आहे. बांधावरील बिगर बीटीवर या बोंडअळ्य़ा उपजीविका करतील, त्यामुळे प्रतिकारक्षम बोंडअळ्य़ांचे प्रमाण ५0 टक्क्यांनी घटवता येईल. तसेच या बोंडअळ्य़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांना काही वर्ष थोपवता येईल, असे या कापूस संशोधकांना वाटते.
‘बीटी’वर बोंडअळय़ांच्या प्रतिकारक्षम पिढय़ांचा वाढला धोका!
By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST