अकोला : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणार्या व कधीकाळी शहराची जीवनदायी असलेल्या मोर्णा नदीची पार दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी नितळ पाण्याच्या या नदीला जलकुंभीचा विळखा पडला असून, या जलवर्गीय वनस्पतीने मोर्णा नदीचा श्वास गुदमरला आहे. स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नसल्याने दिवसेंदिवस नदीची अवस्था अधिकच बिकट होत आहे. फार वर्षांपूर्वी अकोला शहराचा विस्तार फार मोठा नव्हता, तेव्हा मोर्णा जुने शहराच्या बाहेरून वाहत होती. कालांतराने शहर विस्तारत गेले व नदी शहराच्या मध्यभागी आली. आता शहरातील सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यात भरीस भर म्हणून जलकुंभीने संपूर्ण नदीलाच कवेत घेतले आहे. नदीपात्रात केवळ जलकुंभीचेच आच्छादन दिसून येते. मनपा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलकुंभी काढून नदीचा प्रवाह मोकळा केला होता; परंतु आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून, जलकुंभीने मोर्णेचा श्वास गुदमरत आहे. (प्रतिनिधी)
जलकुंभीने गुदमरला मोर्णेचा श्वास
By admin | Updated: May 13, 2017 14:15 IST