अकोला: प्रेम हे आंधळं असतं, असे उगाच म्हटले जात नाही. प्रेमाला वयाचे बंधनही नसते. प्रेम हे केव्हाही आणि कोठेही होऊ शकते. याचाच प्रत्यय गुरुवारी खदान पोलीस ठाण्यात आला. एक ४0 वर्षाची विवाहिता २0 वर्षाच्या युवकासोबत पळून गेल्याचे समोर आले. त्याहीपुढे या विवाहितेची अल्पवयीन मुलगीसुद्धा तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने पोलीसही चक्रावून गेले. खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या एका भागातील ४0 वर्षीय विवाहिता तिचा पती आणि मुलीसोबत राहते. विवाहितेची एका २0 वर्षीय युवकासोबत ओळख झाली. ओळख वाढत गेली आणि दोघे प्रेमात केव्हा आकंठ बुडाले, हे दोघांनाही कळले नाही. याचदरम्यान विवाहितेची अल्पवयीन मुलगीसुद्धा एका युवकाच्या जाळय़ात अडकली. एकाच घरातील मायलेकीचे प्रेम बहरत गेले. विवाहितेने तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचे बेत आखणे सुरू केले. याची कुणकुण मुलीलाही लागली होती. त्यामुळे मुलीनेही तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत आखला. विवाहितेने तिच्या २0 वर्षीय प्रियकारासोबत पलायन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच मुलगीसुद्धा तिच्या प्रियकरासोबतच पळून गेली. पत्नी आणि मुलीचे घृणास्पद कृत्य समोर आल्यावर पतीचा राग अनावर झाला. रागारागातच त्याने खदान पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना त्याची पत्नी युवकासोबत पळून गेल्याचे सांगितले. यादरम्यान ठाण्यात युवकाचा पिता हजर झाला. त्यानेही विवाहितेनेच त्याच्या मुलाला फूस लावून पळून नेल्याचा आरोप केला. यावरून विवाहितेचा पती व युवकाच्या पित्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. वाद वाढत होता. याचदरम्यान विवाहितेची मुलगीसुद्धा पळून गेल्याचे तिच्या पित्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत. या घटनेवरून प्रेमाला वयाचे बंधन नसते आणि आजच्या कलीयुगात जगात काहीही घडू शकते. एवढे विचारांचे अध:पतन झाले आहे, अशी चर्चा पोलिसांमध्ये रंगली होती.
प्रियकर २0 चा, तर प्रेयसी ४0 ची..!
By admin | Updated: December 18, 2015 02:16 IST