बुलडाणा : राजूर घाटांतील खोल दरीत कुजलेल्या दोन युवकांचे मृतदेह शुक्रवारी कुजलेल्या अवस्थेत आढळले. एकाच वेळी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.बुलडाणा शहर पोलिस स्टेशनअंतर्गंंत येणार्या बुलडाणा-मलकापूर रोडवरील राजूर घाटात खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. व्यंकटगिरी परिसरात आढळलेले दोन्ही मृतदेह जवळपास एक महिन्यापासून कुजलेल्या अवस्थेत पडून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दोन्ही मृतदेहांचे फक्त सांगाडे शिल्लक होते. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, दोन बंद मोबाईल फोन आढळले. दोन्ही मृतदेहांच्या शवविच्छेदनाची व्यवस्था घटनास्थळीच करून, अवशेष जिल्हा सामान्य रूग्णालयातील शितगृहात ठेवण्यात आले आहेत. दोन्ही मृतदेह पुरूषांचे असून, त्यांचे वय २५ ते ३0 वर्षादरम्यान असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळ राजूर घाटातील खोल दरीत असल्याने पोलिस पथक व अधिकार्यांना दरीत उतरण्यासाठी दोरखंडाचा उपयोग करावा लागला.
दोन युवकांचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ
By admin | Updated: January 23, 2016 02:01 IST