अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून युतीचे उमेदवार, विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच आघाडीकडून रवींद्र सपकाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारसंघातील समस्या निकाली काढण्याची जाण स्थानिक उमेदवारांना असते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्यावर भारिप-बहुजन महासंघाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघा तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. विधान परिषद निवडणुकीत युतीच्या वतीने विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया, तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सपकाळ निवडणूक लढवित आहेत. अपक्ष अर्ज सादर करणार्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने या दोन उमेदवारांमधील लढत उत्सुकता वाढविणारी ठरत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजोरिया यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये सत्तेची सूत्रे सांभाळणारे भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद सदस्य, महापालिकेचे नगरसेवक तसेच नगर पालिका सदस्यांसोबत बैठक घेतली.
उमेदवार सहज उपलब्ध असावा!
जिल्हा परिषदेला ह्यमिनी मंत्रालयह्ण म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील विकास कामे करताना जिल्हा परिषद सदस्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय जिल्हा परिषदेमार्फत मिळणारा निधी बरेचदा तोकडा पडतो. वरिष्ठ अधिकारी कामचुकारपणा करतात. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी स्वायत्त संस्थांचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार मतदारांना सहज उपलब्ध होणारा आणि संपर्कात असणारा असावा,अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.