अकोला: जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व इतर राज्य मार्गांवर मोटारसायकल किंवा कारमध्ये लिफ्ट मागून लुटणारी टोळी सक्रिय असल्याने, वाहनचालकांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आला. गत काही दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि इतर राज्य मार्गांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून महागड्या कार किंवा वाहनचालकांना अडवून, त्यांना लिफ्ट मागण्याचा बहाणा करण्यात येतो. कारचालक व मोटारसायकलस्वाराने लिफ्ट दिली, तर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती शस्त्राच्या धाक दाखवून त्यांना आडमार्गाला नेतात आणि त्यांच्याकडील रोख व सोन्याचे दागिने लुटून घेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. वाहनचालकांनी विरोध केला तर त्यांना गंभीर जखमी किंवा जीवे मारण्यासही हे गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्ती मागेपुढे पाहत नाहीत. महामार्गावर वाढत्या घटनांमुळे बाहेरगावी प्रवास करणार्या नागरिक, मोटारसायकस्वार, कारचालकांनी सतर्क राहावे. महामार्गावर कोणी अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितल्यास देऊ नये आणि निर्जनस्थळी किंवा आडमार्गाला वाहन थांबवू नये. महामार्गावर असा संशयास्पद प्रकार कुठेही दिसून आल्यास किंवा घटना घडल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, अशी माहितीही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.
सावधान, महामार्गावर लिफ्ट मागून लुटणारी टोळी सक्रिय!
By admin | Updated: May 15, 2015 01:40 IST