शिखरचंद बागरेचा / वाशिमदेशवासीयांच्या रक्षणासाठी जम्मू काश्मीर येथे पुंछ सेक्टरमध्ये सीमेवर बीएसएफच्या चमूत तैनात असलेला आशीष सुधाकर गोडबोले हा २३ वर्षीय जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाला. शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी भारत -पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्यावतीने सीजफायरदरम्यान प्रत्युत्तर देताना आशीष गोडबोले शहीद झाला. यावेळी त्याचा एक सहकारीसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. शहीद आशीष गोडबोलेचे वडील सुधाकर गोडबोले हे सुद्धा सैन्य दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर वाशिम तहसील कार्यालयात नायब नाझर म्हणून सन २00७ पासून कार्यरत आहेत. वाशिम तहसीलचे नायब नाझर सुधाकर गोडबोले यांनीसुद्धा सैन्य दलामध्ये राहून देशाची सेवा केली आहे. त्यांचा मुलगा आशीष गोडबोले हा बीएसएफच्या तुकडीमध्ये सामील होऊन देशसेवा करीत होता. प्राप्त माहितीनुसार शहीद आशीष गोडबोलेचे पार्थिव ५ ऑक्टोबर रोजी परभणीला नेऊन त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
सीमेवर लढताना आशीष शहीद
By admin | Updated: October 5, 2014 01:52 IST