अकोला : पाणीटंचाई निवारण कृती आराखडा अंतर्गत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त सात गावांमध्ये, सात नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ९ लाख ८९ हजार ८९९ रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. उपाययोजनांच्या कामांसाठी अंदाजपत्रके तयार करून, प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील कुंभारी, बोरगाव मंजू, बोरगाव खुर्द, अमानतपूर ताकोडा, सांगवी खुर्द, रामगाव आणि बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर या सात गावांमध्ये प्रत्येकी एक प्रमाणे एकूण सात नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ९ लाख ८९ हजार ८९९ रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, १२ मे रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने संबंधित सातही पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
नळ योजना दुरुस्ती कामांना मंजुरी
By admin | Updated: May 10, 2014 21:35 IST