अकोला: जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुकंपा पदभरती प्रक्रियेत विविध पदांसाठी निवड करण्यात आलेल्या ४२ उमेदवारांना सोमवार, १ फेब्रुवारी रोजी नियुक्त्यांचे आदेश देणार आहेत. जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे उमेदवारांना पदस्थापना देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत कार्यरत असताना विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाते. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अनुकंपा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत १६९ अनुकंपा उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यापैकी शैक्षणिक पात्रता आणि जिल्हा परिषदेअंतर्गत उपलब्ध रिक्त पदांपैकी दहा टक्के रिक्त पदांसाठी ४२ उमेदवारांची अंतिम निवड यादी १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली होती. कंत्राटी ग्रामसेवक, परिचर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, औषध निर्माण अधिकारी , जोडारी व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) इत्यादी रिक्त पदांवर निवड केलेल्या ४२ उमेदवारांना १ फेब्रुवारी रोजी नियुक्त्या देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संबंधित उमेदवारांना पदस्थापनेद्वारे आदेश देण्यात येणार आहेत.