पिंपळखुटा येथे ट्रॅक्टर व इतर वाहनाने मातीची वाहतूक करीत असताना मिलिंद शेषराव वानखडे यांनी फाटक्या चपलेमध्ये तीन ते चार इंचाचे खिळे टोचून वाहनाचे नुकसान व्हावे या हेतूने रस्त्यात टाकले होते. त्यामुळे सहा ट्रॅक्टर व एक मालवाहू वाहन अशी एकूण सात वाहने पंक्चर झाल्याने जवळपास सहा हजाराचे नुकसान झाले होते. याबाबत ट्रॅक्टर मालक गोपाल सदाशिव पानझाडे यांच्या फिर्यादीनुसार चान्नी पोलिसांनी मिलिंद शेषराव वानखडे यांच्याविरुद्ध कलम ४२७, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु केलेली तक्रार खोटी होती. खिळे टाकून वाहने पंक्चर करणारा मिलिंद शेषराव वानखडे नसून इतर अज्ञात व्यक्ती आहे. तक्रार गैरसमजातून करण्यात आल्याचे ट्रॅक्टर मालकांनी पोलिसांकडे तसे लेखी लिहून दिले आहे. त्यामुळे गैरसमजातून करण्यात आलेल्या तक्रारीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. खोट्या तक्रार केल्यानंतर तक्रार मागे घेणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. यापूर्वीसुद्धा पिंपळखुटा येथील दिपिएस विद्यालयातील शालेय पोषण आहारविक्री करताना गावकऱ्यांनी मुख्याध्यापक संदीप चव्हाण व शिपाई सुरेश खोडके यांना रंगेहाथ पकडून चान्नी पोलिसात काही जणांनी तक्रार दिली होती. परंतु दोन ते तीन दिवसातच तक्रार करणाऱ्यांनी घुमजाव केले. आधी खोटी तक्रार द्यायची, नंतर गैरसमजातून तक्रार करण्यात आल्याचे लिहून द्यायचे. या प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंक्चर केल्याची तक्रार खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST