मूर्तिजापूर : तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली. यात दोन जिल्हा परिषद गट तर चार पंचायत समिती गणाचा समावेश आहे. यासाठी सोमवार पर्यंत जिल्हा परिषदसाठी ११ तर पंचायत समितीसाठी २१ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परीषदेच्या लाखपुरी व बपोरी आणि पंचायत समितीच्या लाखपुरी, ब्रम्ही खूर्द, माना व कानडी या जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी ५ जुलै रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या २ जागांसाठी १० उमेदवारांचे ११, तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी २० उमेदवारांचे २१ अर्ज दाखल झाले, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिली. मंगळवार ६ जुलै रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन ९ जुलैपर्यंत अपीलात जाता येईल व १२ जुलैला अपीलाचा निकाल समोर येईल. अपील नसेल, तर १२ व अपील असेल, तर १४ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल, २० जुलैला सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होऊन निवडणूक निकाल बाहेर येतील. या निवडणुकीत तिरंगी लढतीचे सध्याचे चित्र असले तरी याबाबतचे खरे चित्र १४ जुलै रोजी स्पष्ट होईल.
मूर्तिजापुरात जि.प.साठी ११; पं.स.साठी २१ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 7:34 PM