अकोला : पोलिसांवर सर्वांंचाच रोष आहे; परंतु पोलिसही एक माणूस आहे. त्यांची क्षमता, गुन्हेगारीचे प्रमाण आणि पोलिसांचे संख्याबळ लक्षात घ्यायला हवे. वाढती गुन्हेगारी पाहता, पोलिसांची संख्या तुलनेने कमी आहे. आम्हाला आणखी ४0 टक्के मनुष्यबळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले. कावडयात्रा, गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिस अधीक्षकांनी पोलिस मुख्यालयात शहरातील शांतता समितीच्या सदस्यांची सभा बोलाविली होती. या सभेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे, परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेमध्ये महादेव हुरपडे, शौकतअली शौकत, नगरसेविका उषा विरक, सीमा ठाकरे, बुढन गाडेकर, काळे, हाजी उस्मान कुरेशी, सिद्धार्थ शर्मा, रेहमान मामू, मनोहर मल्होत्रा, नगरसेवक गजानन गवई, माजी नगरसेवक महादेव बुंदेले, नगरसेवक सतीश ढगे आदींनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी गुंडगिरीविरूद्ध कडक कारवाई, गस्त वाढविण्याचीही मागणी या सदस्यांनी केली. *आठ महिन्यांमध्ये एकही गुंड तडीपार नाहीपोलिस अधीक्षक मीणा यांनी आपण पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचा आढावा घेतला, तेव्हा येथील पोलिसांनी आठ महिन्यांमध्ये एकाही गुंडविरूद्ध तडीपारीची कारवाई केली नाही, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे सांगताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि जनतेमध्ये समन्वय निर्माण व्हायला हवा. त्यादृष्टीने मी आता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. *गुंडांना मोकळे फिरू देणार नाहीशांतता समितीच्या सदस्यांनी शहरातील गुन्हेगारीचा पाढा पोलिस अधीक्षकांसमोर मांडल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लवकरच पोलिस अधिकारी, कर्मचारी तुम्हाला दिवसरात्र रस्त्यांवर गस्त घालताना दिसून येतील. नव्या दमाने कामाला लागून, गुंडांना शहरात मोकळे फिरू देणार नाही, असेही मीणा म्हणाले.
अकोला पोलिस विभागाला हवे आणखी ४0 टक्के मनुष्यबळ
By admin | Updated: August 14, 2014 02:04 IST