अकोला: धुळवड सर्वत्र साजरी होत असताना, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मनपातील कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम हे पाणी पिण्यासाठी सिंधी कॅम्पजवळील एका ज्युस सेंटरवर गेले असता, या ठिकाणी पाणी मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन चार ते पाच जणांनी नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा आवळला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलिसांनी दोघा युवकांना अटक केली. धुळवडीची सुटी असल्याने, महापालिकेतील जलप्रदाय विभागात मानधनावर काम करणारे कनिष्ठ अभियंता नंदलाल नारायण मेश्राम (४५) हे दुपारी घरातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत रवी धरमसिंह माहोत (३५) हा सहकारीसुद्धा होता. काही वेळानंतर त्यांना तहान लागल्यामुळे ते सिंधी कॅम्प परिसरातील मनपा संकुलासमोरील एका ज्युस सेंटरवर गेले. या ठिकाणी त्यांनी आरोपी मोहसिन मजिद खान (३0) याला पिण्यास पाणी मागितले. मोहसिनने पाणी देण्यास नकार दिल्याने, नंदलाल मेश्राम यांनी तू मला ओळखत नाहीस का, मी महापालिकेतील अधिकारी आहे, असे सांगितले. त्यावर मोहसिन मजिद खान, त्याचा भाऊ जावेद मजिद खान (३२) यांनी मेश्राम यांच्यासोबत वाद घातला. शब्दाने शब्द वाढत गेल्याने, वाद विकोपाला पोहोचला. ज्युस सेंटरवरील मोहसिन, जावेद आणि त्यांच्या ज्युस सेंटरवर काम करणारा नदीम नामक युवकासह आणखी दोघांनी नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा हातांनी गळा दाबला. यातच मेश्राम यांचा मृत्यू झाला. रवी माहोत यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ३२३, ५0४, ५0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मोहसिन मजिद खान व जावेद मजिद खान यांना अटक केली. नदीम व इतर सहकारी फरार आहेत. श्वसननलिका दबल्याने मृत्यू नंदलाल मेश्राम यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात मेश्राम यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला. गळा दाबताना मेश्राम यांची श्वसननलिका दबल्यामुळे श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. असे कारण नमूद केले आहे. चिमूर येथे झाले अंत्यसंस्कार नंदलाल मेश्राम यांचे आई-वडील, भाऊ चिमूरला राहतात. ते नोकरीमुळे अकोल्यात स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर चिमूर येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी नातेवाइकांच्या ताब्यात नंदलाल मेश्राम यांचे पार्थिव देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय पार्थिव घेऊन चिमूरला रवाना झाले.
अकोला मनपा अभियंत्याची गळा आवळून हत्या !
By admin | Updated: March 26, 2016 02:34 IST