अकोला: अकोला महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून वर्धा नगर पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांची बदली होऊन दोन दिवस उलटत नाहीत, तोच कोकणात कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी मिलिंद गावडे यांचीही आयुक्त पदावर बदली झाल्याचा आदेश येऊन धडकल्यामुळे अकोला महापालिकेचे नवे आयुक्त नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची २0 जानेवारी रोजी नागपूर येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून मनपा आयुक्तपद रिक्त होते. आयुक्तपदाचा प्रभार शिवाजी दिवेकर यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी सोमनाथ शेटे यांची आयुक्त म्हणून बदली झाली होती. शुक्रवारी सायंकाळी प्रशासकीय अधिकार्यांच्या बदलीच्या यादीत अकोला मनपाचे आयुक्त म्हणून मिलिंद गावडे यांचेही नाव झळकले. त्यामुळे येथील नगरसेवक व पदाधिकार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गावडे यांची बदली करताना सोमनाथ शेटे यांची बदली रद्द करण्यात आली नाही. यासंदर्भात सोमनाथ शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची अकोला आयुक्त म्हणून ४ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र बदली झाली असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी सायंकाळी मिलिंद गावडे यांची बदली करण्यात आली. वध्र्याहून कार्यमुक्त झाल्यावर रुजू होण्यासाठी अकोला येथे येणार आहे. त्यामुळे गावडे यांची बदली रद्द होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोला मनपा आयुक्त कोण? शेटे की गावडे?
By admin | Updated: February 7, 2015 02:21 IST