अकोला - जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे २0१६ च्या मध्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. यात प्रामुख्याने बॅरेजच्या कामांचा समावेश असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नगरविकास आणि गृह (शहरे) राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि अकोला व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच अकोल्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या महिनाभरातील कामांचा आढावा घेतला. शहर विकासासाठीचे आराखडे, महापालिकांच्या हद्दवाढीचा प्रश्न, गृह खात्याबाबत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आदींची माहिती त्यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अमली पदार्थांंच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अकोला शहरातही राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सायबर गुन्हे रोखण्यासोबतच शहरातील 'चार्ली' आणि राष्ट्रीय महामार्गासाठी 'ट्रॅप' वाहनाची व्यवस्था करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील बॅरेजची कामे २0१६ मध्ये पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे ते म्हणाले. अकोला शहरातील पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, क्षयरोग, सुपरस्पेशालिटी आणि १00 खाटांचे सामान्य रुग्णालयाची कामे पूर्ण करण्यासाठी डे टू डे माहिती घेण्यासाठी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामांच्या फाईलवर दररोज कोणत्या विभागात कोणते काम सुरू आहे, याबाबतची माहिती हा अधिकारी मला देणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावणार!
By admin | Updated: January 6, 2015 01:25 IST