अकोला, दि. १६ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून, त्यासाठी संबंधित महत्त्वपूर्ण विकासकामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी काम झाले असून, अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांमुळे १५ हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २२ हजार ५00 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तसेच अभियानांतर्गत सन २0१६-१७ मध्ये जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये करण्यात आलेल्या कामांमुळे ९८४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले. ह्यमागेल त्याला शेततळे ह्ण योजनेंतर्गत जिल्ह्यास २ हजार ११0 शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला असून, आतापर्यंत १ हजार २८५ शेतकर्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये २२२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २७२ कामे प्रगतीपथावर असून, या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी केले. सन २0१५ मध्ये जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाल्याने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८७६ शेतकर्यांना १२४ कोटी ८८ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान महाअवयव दान अभियान तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर राबविण्यात येणार आहे. अवयव दानाचे महत्त्व ओळखून नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील!
By admin | Updated: August 17, 2016 02:34 IST