अकोला : तुंबलेली गटारे, सर्व्हिस लाईनमधील घाण-कचर्याने गच्च भरलेल्या नाल्या जैसे थे असल्याने शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. मनपातील हिवताप विभागाला डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराच्या (एडीस एजिप्टाय) अळ्य़ा आढळल्या आहेत. अकोलेकरांचा जीव डेंग्यू, कावीळ व हिवतापाच्या साथीमुळे धोक्यात असताना मनपाच्या आरोग्य यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले असून, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य यंत्रणेची आहे; परंतु आजरोजी शहरातील अस्वच्छतेने गाठलेला कळस पाहता, मनपाला कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसून येते. परिणामी मुख्य रस्त्यांसह प्रभागातील रस्ते, मोठे नाले, सर्व्हिस लाईनमध्ये प्रचंड घाण व कचर्याचे ढीग साचले आहेत. खुल्या भूखंडांवर पाण्याची डबकी साचली असून, साफसफाई होत नसल्याने नाल्यांमधील पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे शहरात साथ रोगांचा झपाट्याने फैलाव झाला असून जीवघेण्या कावीळ, डेंग्यू, हिवतापाच्या आजाराने थैमान घातले आहे. अशास्थितीत हिवताप विभागाला एडिस एजिप्टायच्या अळ्य़ा आढळून आल्या आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले असून, त्यावर उपचार करताना नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. डेंग्यूसदृश रुग्णाला रक्ताऐवजी ह्यप्लेटलेटह्णची आवश्यक ता असते. यामुळे रक्तदात्यांचा शोध घेताना नाकीनऊ येत आहेत. मनपाचा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, साथरोग अधिकारी, हिवताप अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असताना आयुक्त कल्याणकर त्यांना पाठीशी घालत आहेत.
शहरात आढळल्या ‘एडिस एजिप्टा’च्या अळ्य़ा
By admin | Updated: September 28, 2014 01:46 IST