अकोला : चंद्रपूर जिलतील गडचांदूर येथील एका १८ वर्षीय युवतीने साखरपुडा टाळून २३ वर्षीय प्रियकरासोबत पलायन केले खरे; परंतु आपल्या कृत्यामुळे कुटुंबाची नामुष्की होईल, या विचाराने ती बुधवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावर उतरली. कुटुंबीयांना खरी परिस्थिती कळू नये, यासाठी तिने आरपीएफ पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. वस्तूस्थिती समोर आल्यानंतर आरपीएफने तिला तिच्या भावाच्या ताब्यात दिले. गडचांदूर येथील एका युवतीचे लग्न जुळले. गुरुवारी तिचा साखरपुडा होणार होता; परंतु नियोजित वरासोबत तिला लग्न करायचे नसल्याने तिने बुधवारी प्रियकरासोबत पलायन केले. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या युवतीच्या मनात अचानक तिच्या कुटुंबीयांच्या नामुष्कीचा विचार चमकला. त्यामुळे ती प्रियकराला न सांगताच बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर उतरली आणि तडक पोलीस ठाणे गाठून स्वत:च्या अपहरणाचा बनाव मांडला. दोन इसम तिचे अपहरण करून नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्याला जाग आली आणि त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत रेल्वे स्टेशनवर उतरले, अशी माहिती तिने सांगितली. दरम्यान, एक युवक ठाण्याच्या जवळपास घिरट्या घालत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला पकडून ठाण्यात आल्यावर त्याने युवतीचा प्रियकर असल्याचे सांगत, आम्ही पळून जात होते, अशी माहिती दिली.
प्रियकरासोबत पलायन करून युवतीने फेरले साखरपुड्यावर पाणी
By admin | Updated: February 6, 2015 02:11 IST