हिवरखेड/तेल्हारा (जि. अकोला): शेतकरी विनोद खारोडे आत्महत्याप्रकरणातील आरोपी साहाय्यक अभियंता संदीप घोडेची गुरुवारी अकोट येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्याला संध्याकाळी अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घोडेला हिवरखेड पोलिसांनी सोमवारी नागपूर येथे अटक केली होती. विद्युत जोडणी मिळत नसल्याच्या उद्वेगातून तळेगाव बाजार येथील २४ वर्षीय विनोद खारोडे या शेतकर्याने १९ मे रोजी विष घेतले होते. विनोदचे वडील रामदास खारोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिवरखेड पोलिसांनी महावितरणचा साहाय्यक अभियंता संदीप घोडे, उपकार्यकारी अभियंता आर.टी. राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासादरम्यान महावितरणकडून माहिती संकलित केली होती. काही शेतकर्यांचे जबाबही नोंदविले होते. दरम्यान, घोडेचा अटकपूर्व जामीन अर्ज आकोट येथील सत्र न्यायालयाने ९ जून रोजी फेटाळला होता. न्यायालयाने त्याची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलिसांनी घोडेच्या अकोला येथील घराची व महावितरणच्या हिवरखेड येथील कार्यालयाची झडती घेतली होती.
आरोपी अभियंता दुपारी न्यायालयीन कोठडीत; संध्याकाळी रुग्णालयात
By admin | Updated: June 19, 2015 02:50 IST