डाबकी रोड स्थित रेणुकानगर येथील रहिवासी निलिमा रूपेश काचकुरे (४७) यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम कार्ड संगणक तंत्रज्ञानाद्वारे क्लोन करून बँक खात्यातून दोन वेळा १० हजार रुपये, असे एकूण २० हजार रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. त्यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या असून, एटीएम कार्ड क्लाेनिंगद्वारे तक्रारकर्त्यांची तीन लाख २९ हजार ५५५ रुपयांनी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांनी बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पहाडपुरा येथील रहिवासी रणधीरकुमार सरजूसिंह (३४) याला १३ जानेवारी रोजी अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस निरीक्षक विजय नाफडे, पोलीस उपनिरीक्षक सागर फेरण, सहपोलीस उपनिरीक्षक दिनेश पवार, श्रीधर सरोदे, पंकज सूर्यवंशी, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, प्रशांत केदारे, राहुल देवीकर यांनी केली.
एटीएम कार्ड क्लोन प्रकरणातील आरोपी गजाआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST