यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. तुरीला किडीचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या रब्बीच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले हाेते.
सुरुवातीच्या काळात या दाेन्ही पिकांची अवस्था चांगली हाेती. अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी या पावसामुळे दाेन्ही पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे दाेन्ही शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली हाेती. शेतकऱ्यांनी दाेन्ही शेतमाल मळणी करून बाजारात विकायला आणला असता, गव्हाला प्रति क्विंटल १६०० ते १८७५ रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल ४२०० रुपये ते ४७५० रुपये भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध नव्हता. परिणामी बाजारातील गव्हाच्या किमती वाढल्या होत्या. आता नवीन गहू बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
--बॉक्स--
हमीभावाने खरेदी केव्हा?
शासनाच्यावतीने जिल्ह्यात केवळ हरभऱ्याची खरेदी केली जात असून, गव्हाची खरेदी केली जात नाही. मागील चार-पाच वर्षाआधी मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून गहू खरेदी केली गेली; मात्र आता शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदीचे कुठलेही आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने गहू खरेदी केंद्र सुरू न केल्याने बाजारातील स्पर्धा कमी झाल्याचा आराेपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.