अकोला: शहरात विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना हटविले जाणार असून, पहिल्या टप्प्यात २00९ नंतर अस्तित्वात आलेल्या ५६ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दिली. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये कारवाईला सुरुवात केली जाईल. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत रस्ते, प्रत्येक ठिकाणी रस्त्यालगत धार्मिक स्थळे उभारण्यात आल्याचे चित्र असून, यामध्ये विविध धर्मीयांचा समावेश आहे. पूज्य व्यक्तींचे पुतळे, देवी-देवतांच्या प्रतिमा मनमानी पद्धतीने लावण्यात आल्या. मुख्य रस्त्यालगत धार्मिक स्थळांचा समावेश असल्याने रस्ता रुंदीकरण करताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय, अशा धार्मिक स्थळांसाठी कोणतीही देखभालीची तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, मनमानीरीत्या व नियमबाह्यपणे उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे तात्काळ हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत. कारवाईच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला वारंवार विचारणा केली जात असल्याचे यावेळी आयुक्त अजय लहाने यांनी बोलताना सांगितले. या विषयावर शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याने २00९ नंतर अस्तित्वात आलेल्या ५६ धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई येत्या चार ते पाच दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २00९ नंतर उभारण्यात आलेल्या इतरही धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाईल.
५६ धार्मिक स्थळांवर चालणार ‘गजराज’
By admin | Updated: December 29, 2015 02:26 IST