लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरकार्यालयीन पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत विविध विभागाच्या लढती या अटीतटीच्या पाहावयास मिळाल्या आहेत. या स्पर्धेत एकूण ३0 विभागांच्या क्रिकेट संघाच्या चमूंचा सहभाग आहे. शास्त्री स्टेडियम येथे पत्रकार क्रिकेट संघाच्यावतीने आंतरकार्यालयीन पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सकाळच्या सत्रात विक्रीकर अधिकारी, लोकमत कार्यालय, आदिवासी शिक्षक संघ यांच्यात तर दुपारच्या सत्रात जलसंधारण विभाग, वकील संघ यांच्यात लढत झाली. सकाळच्या सत्रात पहिला सामना विक्रीकर अधिकारी विरुद्ध लोकमत कार्यालय यांच्यात खेळविल्या गेला. यामध्ये लोकमत कार्यालयाने ८ ओव्हरमध्ये ३ विकेटच्या मोबदल्यात ६९ धावा केल्या. यामध्ये लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल ३ षटकार व २ चौकारांच्या मदतीने ४0 धावा, तर रवी देशमुख १६ यांनी धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यात विक्रीकर अधिकारी संघाला अपयश आले. त्यांना १ धावेने पराभव स्वीकारावा लागला. यामध्ये विरघट यांनी सर्वाधिक ४१ धावा केल्या. दुसर्या सामन्यात आदिवासी शिक्षक संघाकडून विक्रीकर अधिकारी यांना पराभव पत्करावा लागला. आदिवासी शिक्षक संघाने ७६ धावा केल्या. यामध्ये संदीपच्या १५ धावांचा समावेश आहे. या लक्षाचा पाठलाग करताना विक्रीकर अधिकारी संघ केवळ ३७ धावाच करू शकला. तिसरा सामन्यात लोकमत संघाने ७ विकेटच्या मोबदल्यात ८ ओव्हरमध्ये २८ धावाच केल्या. हे लक्ष आदिवासी शिक्षक संघाने १ विकेटच्या मोबदल्यात पार केले. हा सामना आदिवासी शिक्षक संघाने ९ विकेटने जिंकला. यामध्ये नीलेशने सर्वाधिक नाबाद २१ धावा काढल्या. या लीगमध्ये सकाळच्या सत्रात आदिवासी शिक्षक संघाने तर दुपारच्या सत्रात जलसंपदा विभागाने अंतिम १६ मध्ये जागा बनविली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता पत्रकार क्रिकेट संघ पुढाकार घेत आहे.
आंतरकार्यालयीन पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत ३0 संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:07 IST