अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांतील शेतकर्यांना शनिवारी एक लाख शेती मृदा (माती) आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले असून, येत्या दोन वर्षांत आणखी दोन लाख शेतकर्यांना मृदा आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.अकोला जिल्हय़ात १७ हजार आरोग्यपत्रिका शेतकर्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. २0१५ हे आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून पाळण्यात येत आहे. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत पाच जिल्हय़ात एक लाख शेतकर्यांना मृदा आरोग्यपत्रिकेचे वितरण करण्यात आले. येत्या तीन वर्षांत विभागातील सर्व शेतकर्यांना मृदा आरोग्यपत्रिका देण्याचा संकल्प विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. चांगले आणि भरघोस उत्पादन काढायचे असेल तर माती परीक्षण अगत्याचेच नव्हे, तर माती परीक्षण हा शेतीचा मूळ गाभा आहे. पण, याकडेच दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्यांना त्याचा उत्पादनाच्या बाबतीत तोटा सहन करावा लागत आहे. याच पृष्ठभूमीवर या मातीत सोळा सूक्ष्म अन्नद्रव्य असून, शेतीचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने प्रत्येक पावसाळ्य़ात शेतातील माती आणि त्यासोबतच सोळा सूक्ष्म अन्नद्रव्य वाहून जात आहेत. हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याने कृषी विभागाने शेतीचे नवे तंत्रज्ञान शेतकर्यांना सांगितले आहे. उताराला आडवी पेरणी, कंटुर, गादी वाफा पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. परंतु, हे सर्व तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी माती परीक्षण करणे अगत्याचे असल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांनी यावर्षी माती परीक्षण करावे, यावर कृषी विभागाने भर दिला आहे.
पश्चिम विदर्भात ३ लाख शेतक-यांना मिळणार मृदा आरोग्यपत्रिका!
By admin | Updated: December 14, 2015 02:13 IST