- अतुल जयस्वाल
अकोला : भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असले तरी देशात २०२२ या वर्षातील जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत विविध कारणांमुळे २४ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या नोंदीवरून समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक सात वाघांचा मृत्यू झाला आहे.
शिकार,आपसातील झुंजी,नैसर्गिक मृत्यू, अपघात,आपसातील लढाई आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात. एनटीसीएच्या संकेतस्थळावरील ५ मार्च २०२२ पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, विविध कारणांमुळे २४ वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. जानेवारी महिन्यात १४ तर फेब्रुवारी महिन्यात १० वाघ मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये सात मादी व सात नरांचा समावेश आहे.उर्वरित वाघांच्या लिंगाबाबत माहिती मिळू शकली नाही. मृत्यूमुखी पडलेल्या २४ वाघांपैकी १० वाघांचा मृत्यू त्यांच्या अभयारण्य क्षेत्राबाहेर झाला असून,उर्वरित १४ वाघ अभयारण्य क्षेत्रातच मरण पावल्याचे एनटीसीएने स्पष्ट केले आहे.
गतवर्षी दोन महिन्यात २६ वाघांचा मृत्यू
वर्ष २०२१ मध्ये देशभरात १२७ वाघांचा मृत्यू झाला होता. यापैकी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये २६ वाघ मृत्यूमुखी पडले होते. त्यामध्ये आठ वाघ महाराष्ट्रातील होते.
राज्यनिहाय मृत्यू
महाराष्ट्र - ०७
मध्यप्रदेश - ०६
कर्नाटक - ०५
आसाम - ०२
केरळ - ०२
बिहार - ०१
आंध्र प्रदेश -०१