आकोट (जि. अकोला) : इयत्ता तिसरीच्या अपहृत बालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आकोट तालुक्यातील आंबोडा येथील ११ जणांना प्राथमिक चौकशीकरिता शुक्रवारी ताब्यात घेतले; परंतु त्यांच्या चौकशीतून पोलिसांना कोणताही सुगावा मिळाला नाही.आकोट तालुक्यातील आंबोडा येथील पोलीस पाटील महेश जानराव शिवरकर यांच्या शुभम नावाच्या ८ वर्षीय चिमुकल्याचे २५ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी आकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २६ फेब्रुवारी रोजी बोर्डी-रामापूर शेत रस्त्यावरील विहिरीत शुभमचा मृतदेह पोत्यामध्ये बांधून टाकून दिला असल्याचे आढळले. याप्रकरणी शुभमची कौटुंबिक माहिती पोलिसांनी जमा केली. २७ फेब्रुवारीला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्यासह पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शेतविहिरीकडे जाणारे सर्व रस्ते व परिसरात या घटनेशी संबंधित काही धागे-दोरे आढळतात काय, याची तपासणी केली. ताब्यात घेतलेल्या आंबोडा येथील ११ जणांची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली; मात्र शुभमचे अपहरण त्यानंतर हत्या करण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
प्राथमिक चौकशीसाठी ११ जण ताब्यात
By admin | Updated: February 28, 2015 02:24 IST