शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वर्धापन दिन विशेषांक : वारसा आमचा कोणता आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 9:00 AM

स्वातंत्र्योत्तर कालखंडातही नगर जिल्ह्याला जे लोकप्रतिनिधी लाभले त्यांनी देशात ठसा उमटविला.

सुधीर लंके अहमदनगर : ‘स्वातंत्र्य संग्रामात संयुक्त प्रांतात ज्याप्रमाणे नेहरु पिता-पुत्रांमुळे अलाहाबादबद्दल अनेकांना आकर्षण वाटत होते. तसे महाराष्ट्रात पटवर्धन बंधुंमळे अनेकांना अहमदनगरचे आकर्षण वाटे. रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन बंधू तरुणांना ‘हिरो’ वाटत होते’ - दिवंगत समाजवादी नेते ग. प्र. प्रधान यांनी पटवर्धन बंधू आणि अहमदनगर यांचे एके ठिकाणी असे वर्णन केले आहे. पटवर्धन बंधुंबद्दल हा जो आदर होता तो त्यांची राष्ट्रनिष्ठा, बुद्धिमत्ता आणि ध्येयवाद या बाबींमुळे. या दोघांबद्दल देशभर प्रचंड कुतूहल होते. पंडित नेहरु आणि रावसाहेब यांची दृढ मैत्री होती. नेहरु सर्वात शेवटी रावसाहेबांचा सल्ला हमखास विचारात घेत. पटवर्धन बंधूच नाहीत. तर नगर जिल्ह्यातील समकालीन जी पुढारी मंडळी होती ती अशीच ध्येयाने पछाडलेली होती. १९४२ चा लढा आणि तत्पूर्वीही स्वातंत्र्याच्या आंदोलनात नगर जिल्ह्याने मोठी भागीदारी दिली. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून लोकशाही आली. लोकांचे सरकार आले. स्वातंत्र्योत्तर कालखंडातही नगर जिल्ह्याला जे लोकप्रतिनिधी लाभले त्यांनी देशात ठसा उमटविला. नगर दक्षिणेतून पहिले खासदार म्हणून संसदेत पोहोचलेल्या उत्तमचंद बोगावत यांनी अवघ्या १३ हजार रुपयांत निवडणूक लढवली होती. ‘आप मेरे साथ चलो’ म्हणत त्यांनी पंडित नेहरुंना नगर जिल्ह्यात आणले आणि इथला दुष्काळ दाखविला. भाऊसाहेब फिरोदिया यांनी आपल्यावर राजकीय संस्कार केले म्हणून पुढे खासदारकीच्या उमेदवारीस नकार देत बोगावत यांनी मोतीलाल फिरोदिया यांना उमेदवारीची संधी दिली. पुढे फिरोदिया यांनीही इतरांना संधी मिळावी म्हणून दुस-या ‘टर्म’ला उमेदवारी करणे नाकारले. पंडित नेहरु नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवान होते तेव्हा फिरोदिया परिवार त्यांच्या संपर्कात होता. दत्ता देशमुख हे नगर जिल्ह्यातील डाव्या चळवळीतील मोठे पुढारी. १९४६ साली ते अकोले, संगमनेर, नेवासा, शेवगाव आदी आठ तालुक्यांचा समावेश असलेल्या ‘नगर उत्तर’ मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार झाले. पाणी आणि शेती या प्रश्नांचा अफाट अभ्यास असणा-या या लोकनेत्याने त्यावेळी विधानसभा दणाणून सोडली. काँग्रेसमध्ये असतानाही शेतक-यांसाठी ते कम्युनिस्टांच्या मोर्चात सहभागी व्हायचे. त्यामुळे काँग्रेसनेच त्यांना जेलमध्ये टाकले. आमदारकीही रद्द केली. पण, ते पुन्हा निवडून गेले. पुढे लाल निशाण पक्षाचे राज्य पातळीवर नेते झाले. ‘काँग्रेसमध्ये या. राज्याचे नेतृत्व करा’ ही ‘आॅफर’ त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी दिली. पण, दत्तांनी ती नाकारली. अन्यथा ते मुख्यमंत्रीही होऊ शकले असते. सामाजिक आंदोलनात नगर जिल्हा सतत आघाडीवर राहिला. जनतेसाठी चळवळी उभारल्या म्हणून पारनेरच्या पांडुरंग बापट यांना लोक ‘सेनापती बापट’ म्हणून ओळखू लागले. शेतकºयांचा लाँग मार्च व आदिवासींच्या मोर्चांची आज चर्चा होते. पण, टिटवाळा येथील किसान सभेच्या अधिवेशनासाठी शेतकºयांचा लाँग मार्च नगर जिल्ह्यातूनच बुवासाहेब नवले यांनी काढला होता. ऊस तोडणी मजुरांचे आंदोलन बबनराव ढाकणे यांच्यासारख्या नेत्याने उभारले. संयुक्त महाराष्ट्रचे आंदोलन व नगर जिल्हा हा तर मोठा इतिहास आहे. या आंदोलनादरम्यान नगर जिल्ह्यात संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५७ साली जी निवडणूक लढवली त्यात काँग्रेसचे केवळ बाळासाहेब भारदे विजयी होऊ शकले. अन्य सर्व जागा समितीच्या माध्यमातून डाव्या पक्षांनी जिंकल्या. त्यावेळी काँग्रेसचे धोरण पटले नाही म्हणून बी.जे. खताळ यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली होती. खताळ हे एकमेव असतील जे सत्तर वर्षे सतत काँग्रेससोबत आहेत. शेतक-यांवर आयकर लादू नका ही भूमिका त्यांनी देशपातळीवर घेतली. देशातील कृषी क्रांतीत काँग्रेसच्या अण्णासाहेब शिंदे यांनी मोठे योगदान दिले. तोही एक इतिहास बनला. आज जेव्हा पक्षांतरांच्या वावटळी उठतात. सत्तेसाठी हव्या तशा राजकीय तडजोडी होतात. पैशांच्या थैल्या घेऊन नेते निवडणुकांत उतरतात. तेव्हा हा त्यागाचा, ध्येयवादाचा इतिहास नवीन राजकीय पिढीला व नवमतदारांना ठाऊक आहे का? तो कुणी जाणीवपूर्वक सांगते आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. १९४२ चा लढा ते इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीचा कालखंड या काळात नगर जिल्ह्यात समाजवादी, डावे यांचा प्रभाव होता. कर्तबगार नेते जिल्ह्याने या काळात दिले. १९८० नंतर राजकारणच बदलले. त्यात व्यवहार शिरला. धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकारी साखर कारखानदारीचा पाया या जिल्ह्यात घातला. मोतीभाऊ फिरोदिया, बाबूराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, औताडे या मंडळींनी येथील सहकार वाढविला. सहकारमंत्री असताना १९६० साली नगर जिल्ह्यातीलच बाळासाहेब भारदे यांनी ‘महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक’ विधीमंडळात मांडले व मंजूर करुन घेतले. यावेळी भाषण करताना भारदे सभागृहात म्हणाले, ‘जगाने सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट हा सिद्धांत मान्य केला आहे. म्हणजे बलवान असतील ते जगतील. पण, भारताची विग्रहापेक्षा ‘संग्रह’ आणि संघर्षापेक्षा ‘सहकार’ ही संस्कृती आहे’.नगर जिल्ह्यातील डावे जसे आक्रमक होते. तसे उजव्या विचारसरणीचे पुढारीही जिल्ह्यातून पुढे गेले. माणिकराव पाटील हे प्रांत संघचालक होते. सूर्यभान वहाडणे, राजाभाऊ झरकर यांनीही हा उजवा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढे ना.स. फरांदे यांचे नेतृत्वही नगर जिल्ह्यातूनच  घडले. दादासाहेब रोहम, आर.डी. पवार, दादासाहेब रुपवते, बाबूराव भारस्कर आदींच्या  माध्यमातून दलित चळवळही जिल्ह्यात जोमात होती. स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना, बापूसाहेब भापकर, रामभाऊ नागरे, भास्करराव जाधव, मधुकर कात्रे, किशोर पवार आदी मंडळींनी स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळही जोमाने वाढवली. महिलांच्या आघाडीवरही हिराबाई भापकर, कमलाबाई रानडे, जानकीबाई आपटे या विविध आंदोलनांत अग्रेसर होत्या. ‘मरेपर्यंत समाजसेवा करणार’ अशी प्रतिज्ञा बापूसाहेब व हिराबाई भापकर यांनी नगर कचेरीत जाऊन घेतली होती. हिराबार्इंनी लोकल बोर्डावर असताना जिल्ह्याचा दौरा केला. ८०-९० वर्षांपूर्वी जानकीबाई आपटे यांनी विधवा व वेश्या पुनर्वसन, हिंदू-मुस्लिम ऐक्य या क्षेत्रात धडाडीने काम केले. बाबा आढावांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरु करण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांनी संगमनेरात पाणवठे एक केले होते. १९४२ चा लढा ते आणीबाणीचा कालखंड हा काळ भारावलेला होता. या कालखंडात जिल्ह्यात सामाजिक व राजकीय जीवनात जे नेते कार्यरत होते ती व्यक्तिमत्त्व नवीन पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ‘वारसा’ या विशेषांकात करत आहेत. वर्धापन दिनानिमित्त वाचकांसमोर मुद्दामहून काही दुर्लक्षित बाबी मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. २०१८ साली आम्ही जिल्ह्यातील सर्व शहीद जवानांचे स्मरण ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकाद्वारे केले. देशासाठी प्राण ठेवलेल्या या जवानांचे स्मरण जिल्ह्याला कायम रहावे यासाठीचा हा प्रयत्न होता. २०१७ साली आपल्याच जिल्ह्यातील जे सुपुत्र सातासमुद्रापार झेंडा फडकावत आहेत त्यांची दखल घेणारा ‘भूमिपुत्र’ हा विशेषांक आम्ही प्रकाशित केला. जगभर असलेले ‘ग्लोबल नगरी’ या माध्यमातून तरुण पिढीसमोर आले. ‘वारसा’ या विशेषांकात जिल्ह्यातील अनेक जाणकारांनी लेख लिहून जिल्ह्याचा जुना सामाजिक, राजकीय वारसा  जनतेसमोर मांडला आहे. शब्द आणि वेळ या दोन्ही बाबींची मर्यादा असल्याने हा विशेषांक  परिपूर्ण असेल असा आमचा दावा नाही. सर्व व्यक्तिमत्त्वांचा एकाच अंकात वेध घेणेही अवघड असते. त्यामुळे शक्य तेवढी व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लेखकांनी जुने संदर्भ शोधून हे लेख लिहिले आहेत. हा केवळ सामाजिक व राजकीय क्षेत्राचा वारसा आहे. इतरही क्षेत्रात जिल्ह्याला मोठा वारसा आहे. मात्र त्या क्षेत्रांना येथे स्पर्श केलेला नाही. नगर जिल्हा हा पूर्वी डावे, समाजवादी यांचा बालेकिल्ला होता. नंतर येथे काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले. राष्ट्रÑीय स्वयंसेवक संघ, भाजप यांचे पूर्वी मर्यादित स्थान होते. मात्र, आता सत्तेच्या वाटेत भाजप व काँग्रेस बरोबरीत आहेत. महात्मा गांधींचा विचार ते मोदीपर्व असा हा प्रवास आहे. केवळ राजकीय विचारसरणीत बदल घडला असे नव्हे. जिल्ह्यात पूर्वी सर्व जाती-धर्माचे पुढारी दिसत. याच जिल्ह्यातून एस.एम.आय. असीर सर हे मुस्लिम असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. आता दलित, मुस्लिम नेतृत्व जवळपास संपत चालले आहे. मराठा नेतृत्व काही घराण्यांपुरते उरले आहे. तर ओबीसी जातींनाही सत्तेत फारसे स्थान मिळायला तयार नाही. काही गावांत लाल बावट्याची धग आजही कायम आहे. मात्र, भांडवलदारी व्यवस्थेत त्यांचा आवाज ‘सोशल’ व्हायला तयार नाही. बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळही नेतृत्व शोधते आहे. चळवळी अस्ताला लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षात विवेकी राजकारणाचा अस्त होऊन ‘राजकीय व्यवहार’ महत्त्वाचा बनला आहे. सलोखाही संपत चालला आहे. त्यास काँग्रेस, भाजप यापैकी कुणीही अपवाद उरलेले नाही. भारतीय राजकारणात महाराष्ट्र का मागे पडत आहे? याची रावसाहेब पटवर्धन यांना खंत होती. ‘समाजातील सर्व स्तरांतील लोकांना ज्यांचे नेतृत्व मान्य आहे असा पुढारी आम्ही निर्माण केला नाही या कबुलीजबाबात या समस्येचे उत्तर आहे’, असे रावसाहेबच म्हणायचे. रावसाहेबांची ती खंत आजही कायम आहे. पुढारी, नेते घडण्याची प्रक्रियाच बंद होत चालली आहे. आम्ही वारसा हरवत चाललो आहोत. लोकनेते घडणे थांबले आहे. ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ लिहिताना नगरच्या किल्ल्यात पंडित नेहरुंनी स्वत:ला एक प्रश्न केला होता. ‘माझा वारसा कोणता आहे? कशाचा मी वारसदार?’ मानवजातीचे सारे विचार, सर्व भावना, तिची सुखदु:खे, तिच्या वेदना, यातना, आनंद या सर्व बाबींचा मी वारसदार आहे. तिच्या विजयोन्मादाच्या गर्जना नि तिच्या पराभवासमयीच्या केविलवाण्या किंकाळ्या यांचा मी वारसदार आहे. हे सारे आणि इतर पुष्कळ या सर्वांचा मी वारसदार आहे, असेही त्यांनी नमूद केले होते. आमचाही तोच प्रयत्न आहे. -  माझा वारसा कोणता आहे? कशाचा मी वारसदार? हे या अंकातून वाचकांनी ठरवावे. 

(सुधीर लंके, ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्ती संपादकीय प्रमुख)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत