आश्वी : झरेकाठी (ता़ संगमनेर) येथे मोबाईल शॉपी चालविणा-या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.झरेकाठी (ता़ संगमनेर) येथील सतिष बाबुलाल मकवाने (वय २५) या तरुणाचे गुहा-शिबलापूर रस्त्यावर मोबाईल शॉपी आहे. शुक्रवारी रात्री दुकानातील काम संपवून जेवण झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या आदर्श क्रिडा सांस्कृतिक व युवा विकास मंडळाच्या व्यायाम शाळेत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी सतिष याचा पुतण्या मिथून मकवाने शाळेत जात असताना त्याला व्यायाम शाळेचा दरवाजा उघडा दिसला. त्याने आत डोकावले असता सतिश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मिथून याने पाहिले. त्याने सतिषचे वडील बाबुलाल मकवाने यांना ही घटना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलीस पाटील सुदाम वाणी यांनी आश्वी पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याराव वाघमारे, भारत जाधव, महादू खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
झरेकाठीच्या तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 16:19 IST