बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेमार्फत कोविड १९च्या काळात समाजकार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या परिषदेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी सभागृहात उपस्थित होते. दिल्ली विद्यापीठाचे वरिष्ठ प्रा. डॉ. संजय भट्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गुवाहाटीच्या उपसंचालक प्रा. कल्पना सारथी, मातृसेवा संघ, नागपूर येथील डॉ. केशव वाळके, डॉन बॉस्को गोवा येथील प्रा. पंकज कुंभार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या परिषेदस विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व प्रत्यक्ष कार्य करणारे विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
यावेळी पवार म्हणाले की, गावकऱ्यांनी ठरवले तर आपण कोरोनाला आळा घालू शकतो, हे हिवरेबाजार गावात राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समोर आले. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपण आवश्यक काळजी घेऊन आत्मविश्वासाने शाळा व महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज हिवरेबाजार येथील शाळा कोणत्याही अडचणीशिवाय अडीच महिन्यांपासून नियमितपणे भरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशभरातून प्रयत्न झाले आहेत. विविध राज्यांतील समाजकार्याचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापक यांनी आपापल्या स्तरावर बहुमोल कार्य केले आहे. विविध स्तरावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची माहिती एकमेकांना व्हावी तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये समाजकार्यकर्त्यांनी कोणते कार्यक्रम राबविणे आवश्यक आहेत, यावर मंथन व्हावे, या उद्देशाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. संजय भट्ट, प्रा. कल्पना सारथी, डॉ. केशव वाळके यांनीही ॲानलाईन संवाद साधत मदतकार्याची माहिती दिली. प्रा. प्रदीप जारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय संसारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. जेमोन वर्घीस, आसावरी झपके, रवी राठोड, सॅम्युअल वाघमारे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
फोटो - ३१सीएसआरडी
सीएसआरडी संस्थेत आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना पद्मश्री पोपटराव पवार, समवेत सीएसआरडीचे संचालक डाॅ. सुरेश पठारे.