बोधेगाव : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना जीव धोक्यात घालून कामे करावी लागतात. अशा जोखिमेच्या कामांवर कामगारांना सुरक्षितता मिळावी, यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाकडून सुरक्षा साहित्य दिले जाते. या सुरक्षा कवचाचे बुधवारी (दि.३) बोधेगाव (ता. शेवगाव) येथील विश्वकर्मा संस्थेमार्फत कामगारांना वाटप करण्यात आले.
राज्य शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अहमदनगर यांच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत सेफ्टी किट दिल्या जातात. या सेफ्टी किटमध्ये हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जॅकेट, बुट, बॅटरी, चटई, मच्छरदाणी आदींसह १० ते १२ साहित्याचा समावेश असतो. या साहित्याच्या वापराबाबतचे प्रात्यक्षिक बुधवारी बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे विश्वकर्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष गोकूळ घोरतळे, सचिव सचिन राजपुरे, उपाध्यक्ष सीताराम पाटील व संघटनेचे सदस्य यांच्या हस्ते ज्ञानेश्वर कवडे, अण्णासाहेब शिंदे, भारती करपे, मीराबाई घुगे आदी लाभार्थ्यांना साहित्य देण्यात आले.
यावेळी ईश्वर परदेशी, तुकाराम पाटेकर, महेबूब शेख, कैलास ससाणे, भागवत भोसले, भारत वाघुंबरे, छबुराव परदेशी, ढाकणे मामा, पांडुरंग नंदगुरे, सोमनाथ वैद्य, भाकचंद उघडे, अशोक तारक, विकी सुपेकर आदींसह बांधकाम व्यावसायिक, कामगार उपस्थित होते.
---
०८ बोधेगाव
बालमटाकळी येथे प्रात्यक्षिकादरम्यान सुरक्षा कवच परिधान केलेले बांधकाम कामगार ज्ञानेश्वर कवडे.