भाऊसाहेब येवले, राहुरी ज्या ओसाड खडकाळ रानात पोतंभर धान्य मिळत नव्हतं, तिथे प्रचंड कष्ट व आत्मविश्वासाच्या जोरावर महिला शेतकऱ्याने तब्बल ११ एकर डाळिंबाची बाग फुलवून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. हेमलता संदीप कोळसे असे या महिलेचे नाव असून, गुहा (ता़ राहुरी) येथे पाणी टंचाईवर मात करीत तिने शेती फुलवली आहे. हेमलता यांचे लग्न झाल्यानंतर त्या शेतात जाऊ लागल्या़ तेव्हा दीड एकर क्षेत्रावर अवघे तीन बाजरीचे पोते उत्पादन मिळत होते़ जमीनही दगडगोटे असल्याने खराब होती. त्यामुळे त्यांनी प्रथम शेतीची मशागत केली व डाळिंबाचा बाग लावण्याचा निश्चय केला. दहा बाय तेरा या आकारावर भगवा डाळिंबाची लागवड करून त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केली. सुरूवातीला तीन एकर बाग उभी केली. त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य बँकेकडून घेतले. नातेवाईकांनीही काही मदत केली. पती संदीप कोळसे यांना दूध व्यवसाय व अन्य शेती कामात मदत करण्यात हेमलता यांचा सिंहाचा वाटा आहे. डाळिंब शेती करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. हेमलता अवघ्या एका दिवसात ट्रॅक्टर चालविण्यास शिकल्या़ महिनाभरात त्या चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर चालक बनल्या़ डाळिंबावर फवारणी मारण्याचे काम हेमलता सहज करतात़ ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून बागेतील झाडांना खत टाकण्याचे व काकऱ्या मारण्याचे कामही हेमलता करतात़नंतर त्यांनी डाळिंब बागेसाठी शेजारील जमीनही विकत घेतली.अकरा एकर डाळिंब बाग उभी राहिल्यानंतर पाण्याची टंचाई जाणवू लागली़ पाटाजवळ दोन किलोमीटर अंतरावर दोन गुंठे जमीन विकत घेऊन त्यांनी तेथून पाण्याची व्यवस्था केली. अनुभवातून डाळिंबाला पाणी, खते, छाटणी व औषध फवारणीचे धडे हेमलता कोळसे यांना मिळाले आहेत़डाळिंबाच्या शेतात मला ट्रॅक्टर चालवताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटते़ डाळींब शेती करताना पती, सासू, सासरे व मुलगा यांचे सहकार्य लाभले़ अनुभवातून शेती केली की यश येते़ माळरानावर डाळींब शेती फुलविली याचे समाधान वाटते़- हेमलता कोळसे, शेतकरी
महिलेचा ‘पुरूषार्थ’
By admin | Updated: June 23, 2014 16:54 IST