बोटा : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवती जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव शिवारात घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका अशोक हांडे (वय २१, रा. वनकुटे) ही युवती आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ती स्कूटीवरून (एम. एच. १४, आर. के. ६९४६) नेहमीप्रमाणे आळेफाटा येथून घारगावकडे येत होती. नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव शिवारात संगमनेरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने हॉटेल दौलतसमोर तिला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राधिका हांडे जबर मार लागल्याने रक्तस्राव होवून जागीच ठार झाली. याप्रकरणी सोमनाथ हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले करीत आहेत. (वार्ताहर)
वाहनाच्या धडकेत युवती जागीच ठार
By admin | Updated: May 8, 2016 23:55 IST