जामखेड : तालुक्यातील साकत शिवारातील पवनचक्की कंट्रोल रूममधून आठ लाख रुपयांच्या केबल व सिटी मोड्युल्सची चोरी करणाऱ्यांना जामखेड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच जेरबंद केले. त्यांच्याकडून चाेरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत भूषण युवराज मांडेवार (व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा. लि. ज्युनियर इंजिनीयर) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ७ ते ९ जुलै २०२१ दरम्यान साकत शिवारातील व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा. लि. कंपनीच्या पवनचक्की कंट्रोल रूममधून वापरात असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या जुन्या केबल्स किंमत ३ लाख ९७ हजार ३०० रुपये व सीटी मोड्युल किंमत ४ लाख १० हजार २५० रुपयांचे चोरून नेले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना एका टोळीची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात व गुन्हे शोध पथकाला घडलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल महेंद्र विष्णू पवार (वय २३) याच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने महेंद्र विष्णू पवार याच्या घराची झडती घेतली. तेथे ३५ हजार रुपये किमतीची ३५ किलो केबलमधील तांब्याची तार मिळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने इतर आरेापींचीही नावे सांगितली.
त्यामध्ये बालाजी बापू काळे (वय २१), रमेश अशोक शिंदे (वय ३८), उमेश बलभीम काळे (वय २४) सर्व रा. आरोळे वस्ती, जामखेड असे सांगितले. पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक राजू थोरात, पो. कॉ. अविनाश ढेरे, संग्राम जाधव, संदीप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरुण पवार, सचिन देवढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.