लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या इतर महापालिकांमध्ये बदल्या करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. नगर परिषदेच्या धर्तीवर महापालिकांचा राजय संवर्ग तयार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
‘लोकमत’मध्ये ‘महापालिकेतील अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही’ या मथळ्याखाली वृत्त मालिका प्रकाशित करण्यात आली होती. या वृत्त मालिकेबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, महापालिकेतील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. नगर परिषदांमध्ये अशीच परिस्थती होती. मात्र, राज्यातील सर्व नगरपालिकांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांचा राज्य संवर्ग तयार केला गेला. त्यानुसार नगर परिषदेतील शहर अभियंता, विद्युत अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, नगररचना, स्वच्छता, लेखा व वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या एका विभागांतर्गत बदल्या करण्यास सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत विचार होण्याची गरज आहे. यावर सविस्तर अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय राज्यातील सर्व महानगरपालिकांतील अधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात येईल, असे तनपुरे म्हणाले.
महापालिकेतील नगररचना, पाणीपुरवठा, बांधकाम हे विभाग महत्त्वाचे आहे. कोणत्याही शहराचं शहरपण टिकवून ठेवण्यासाठी नगररचना विभागाचे महत्त्व आहे. नगररचना विभागात वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत, हे योग्य नाही. या सर्व बाबींचा अभ्यास करून निश्चितपणे निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेण्याच्या मानसिकतेत सरकार आहे.
....
पहिल्या टप्प्यात २० टक्के लिपिकांच्या बदल्या
महापालिकेतील लिपिकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी १०० टक्के बदल्या करणे शक्य नाही. मात्र, टप्प्याने बदल्या करणे शक्य असून, पहिल्या टप्प्यात २० लिपिकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यास सुरुवात करणार आहे.
-शंकर गोरे, आयुक्त, अहमदनगर महापालिका