अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कळीत होऊ नये यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत उद्योजकांनी मांडलेल्या सूचनांबाबत एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, एमआयडीसीमध्ये शंभर बेडचे एक कोविड सेंटर सुरू करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उद्योजकांकडे केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर उद्योजकांमध्ये मोठी चिंता आहे. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जिल्हा नियोजन भवनात उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी महसूल व आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचे अधिकारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अरविंद पारगावकर व उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोसले यांनी उद्योजकांशी संवाद साधला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू राहतील यादृष्टीने पावले टाकली आहेत. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू होऊ शकले. दुकानांची वेळ वाढवून मिळावी, अशी अपेक्षा उद्योजकांनी बैठकीत व्यक्त केली. यासह उद्योजकांच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत दिली. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करून उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरू ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
उद्योजक, व्यापारी यांचे म्हणणे राज्य शासनाकडे पाठवू. मात्र, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यादृष्टीने सर्व उद्योगांनी पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय पूर्ण बंद राहिले. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे थांबल्याचे चित्र होते. संभाव्य तिसऱ्या लाटेत अर्थचक्र सुरळीत सुरू राहावे, याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आता उद्योजकांनीच पुढाकार घेतला आहे.
--------
..यावर भर देणार
शंभर बेडचे कोविड सेंटर
प्रत्येक कामगाराची रोज तपासणी
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन
इतर गावातून येणाऱ्या कामगारांचे आरोग्य कार्ड
--------
जिल्ह्यात तीन हजार उद्योग
जिल्ह्यात तीन हजार उद्योग असून, तेथे एक लाखाहून अधिक कामगार काम करीत आहेत. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत कशाप्रकारे हे उद्योग सुरू ठेवता येतील, यासंदर्भात उद्योजक प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. बराचसा कामगारवर्ग हा बाहेररून ये-जा करणारा असतो. त्यामुळे तो प्रतिबंधित क्षेत्रातून येणारा नसावा. उद्योगातील एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी संसर्गाची भीती इतरांना असते. त्याचा परिणाम उद्योगांवर होतो, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
------------
फोटो- १५कलेक्टर
एमआयडीसी येथील उद्योजकांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले. समवेत अरविंद पारगावकर व उद्योजक.